विशेष वृतान्त

गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

चंद्रपुरातील बिनबा गेट परिसरातील घटना ; एक जखमी

 

चंद्रपूर : शहरासह बल्लारपूर आणि राजुरा येथील गोळीबारीच्या घटना ताज्या असतानाच, आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शहरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार या बिर्याणी सेंटर तथा हॉटेलमध्ये कुख्यात गुंड शेख हाजी शेख सरवर याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर त्याच्यावर चाकूनेही वार करण्यात आले. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चंद्रपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

 

मागील काही वर्षांत जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. कोळसा, वाळू, ऑनलाइन क्रिकेट सट्टा, गुटखा, तंबाखू व दारू तस्करीने गुन्हेगार आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्याने गुन्हेगारीला अधिक बळ मिळाले आहे. बल्लारपूर शहरातील कापड विक्रेते मालू यांच्या दुकानावर अज्ञात आरोपींनी पेट्रोल बॉम्ब हल्ला केला. मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाला होता. राजुरा शहरातील आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर शिवज्योतसिंग देवल (२८) या युवकावर दुचाकीने आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याची हत्या केली.

 

या घटना ताज्या असतानाच आज दुपारी शहरातील शाही दरबार या हॉटेलमध्ये कुख्यात गुंड शेख हाजी शेख सरवर याच्यावर अज्ञातांनी गोळीबार आणि चाकूहल्ला केला. यामध्ये शेख सरवरला दोन गोळ्या लागल्या. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभावती एकुरके हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे चंद्रपूर शहराची मिर्झापूरच्या दिशेने वाटचाल होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

घुग्घुस येथील मूळ रहिवासी असलेल्या शेख हाजी शेख सरवर याने कोळसा व रेती तस्करीत गुन्हेगारीचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. काही वर्षांपूर्वी घुग्घुस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तिरुपती पॉल याची भर रस्त्यात तलवारीने हत्या केली होती. त्यानंतर शेख हाजी हा कारागृहात होता. काही वर्षांपूर्वी कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुन्हा त्याने गुन्हेगारी वर्तुळात स्वतःचा धाक निर्माण केला. घुग्घुस येथे गोळीबार केला. अनेक प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने त्याला हद्दपारदेखील करण्यात आले होते. तसेच राजुरा येथे कोल वॉशरी येथेही त्याने गोळीबार केला होता.

 

आज तो चंद्रपूर शहरात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्याचा शिवा नावाचा एक अन्य साथीदार जखमी झाला. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. गोळीबार झाला तेव्हा हाजीसोबत पाच सहकारी होते. गोळीबार करणारे पाच ते सहा जण चेहऱ्याला कापड बांधून आले होते.

 

जिल्हा रुग्णालयात तणाव

जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी हाजी शेख याला आणले असता समर्थकांनी मोठी गर्दी केली. हाजी शेख समर्थक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!